पर्यायी विमानाची अडचण; प्रवासी
७ तास ताटकळले
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : खराब हवामानामुळे बुधवार (दि.१) रात्री शहराच्या आकाशात घिरट्या घालत परत गेलेले नवी मुंबई-छत्रपती संभाजीनगर इंडिगोच्या विमानाला पर्यायी विमान उपलब्ध करून देण्यास कंपनी असमर्थ ठरल्याने प्रवाशांना तब्बल सात तास मुंबईत ताटकळावे लागले. पर्यायी व्यवस्थेनंतर हे विमान गुरुवारी (दि.२) पहाटे ४.३० वाजता शहरात दाखल झाले. विमानतळावर उतरताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. रात्री खराब हवामानामुळे मुंबईहून छत्रपती संभाजीनगरात आलेल्या विमानाला उतरण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे हे विमान आल्या पावली परतले. मुंबई विमानतळावर विमान थांबल्यानंतर त्या विमानांऐवजी दुसरे विमान शहराकडे पाठवण्याची तयारी इंडिगोकडून करण्यात आली. दरम्यान पर्यायी विमान वेळेत उपलब्ध करून देण्यास कंपनीला अपयश आल्याने येथून परत गेलेल्या प्रवाशांना तब्बल सात तास प्रतीक्षा करावी लागली. यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. पर्यायी विमान उपलब्ध झाल्यानंतर हे विमान गुरुवारी पहाटे ३:३० च्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडे झेपावले. ते सकाळच्या सुमारास चिकलठाणा विमातळावर दाखल झाले. या घटनेमुळे प्रवाशांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.















